महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज पार्कात गुढीपाडव्याला जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी व्हिडीओ दाखवत माहीममधील एका अनधिकृत मजारीबद्दल उल्लेख केला आणि राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. या सभेत दिलेल्या निर्धारित वेळेपूर्वीच मुंबई मनपाने त्वरीत कारवाई केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याचा परिणाम माहीम आणि सांगली येथील कारवाईनंतर चांगलाच दिसत आहे. राज ठाकरे यांच्या या सभेनंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे अशातच मनसे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी मानखुर्द येथील म्हाडा कॉलोनीच्या मागे अनधिकृत मशिदीच्या बांधकामाचा फोटो ट्विट करून थेट मुंबई मनपाकडे कारवाईची मागणी केली आहे.
सतीश नारकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मानखुर्द येथील म्हाडा कॉलनी, बिल्डिंग क्र. १०६ च्या मागे पण अनाधिकृत मशिदीचे काम चालू, चौकशी करून त्वरित कारवाई करण्यात यावी असे ट्विट करून त्यांनी मागणी केली आहे. यावर आता मुंबई महानपसह राज्य सरकार काय कारवाई करते हे पाहावे लागणार आहे.
माहीम दर्ग्यानंतर सांगलीत आणि पुण्यातदेखील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली. त्यापैकी सांगलीत कारवाई देखील झाली. मात्र आता पनवेलमधील पारगावच्या दर्ग्यावर कारवाई कधी, असा सवाल मनसेकडून बॅनरबाजी करत विचारण्यात येत आहे. मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी ही बॅनरबाजी करत पनवेलच्या पारगावमधील दर्ग्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.