मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत. आज 15 ऑगस्ट रोजी नवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र यावेळी आयपीएल मध्ये धोनीला पाहता येणार आहे.
भारताचा कर्णधार असताना त्याने भारताचे नाव सर्वच स्तरावर उंचावले. आणि संघ एका मजबूत उंचीवर नेऊन ठेवला.2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाच्या खात्यात मांडली जाते. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही बेस्ट फिनिशार, अखेरच्या षटकात वादळी फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं.
15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.
पण 2019 सालच्या विश्वचषकात मात्र धोनीची कामगिरी उल्लेखनीय ठरली नाही. धोनीला त्या विश्वचषकात एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळं या विश्वचषकानंतर धोनी गेले सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला. त्याच्या या निवृत्तीनंतर चाहत्यांना मात्र दुःख झाले आहे.