महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची विशेष बैठक बोलावली होती. ही बैठक संपल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीत काय निर्णय घेतले गेले याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तात्पुरता तोडगा काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूने कोणताही दावा केला जाणार नाही, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.सीमेवरुन जो वाद निर्माण झाला होता तो संपवण्यासाठी मी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत येण्याचे आदेश दिले होते. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आणि इतर महत्त्वाच्या अधिकारी आणि नेत्यांसमोर सकारात्मक चर्चा झाली. चांगल्या वातावरणात चर्चा झाली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक मुद्दे ठेवले आहेत, असे अमित शाह म्हणाले.
सीमा प्रश्नावर भांडण करुन नाही, रस्त्यावर उतरुन नाही तर संविधानाच्या कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटू शकतो, असं बैठकीत निश्चित झाले . काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यत कोणतंही राज्य या विषयावर कोणताही दावा करणार नाही, असे शाह यांनी स्पष्ट केले. दोन्ही राज्यांना मिळून, दोन्ही बाजूने प्रत्येकी तीन असे सहा मंत्री बसतील आणि या विषयी सविस्तर चर्चा करतील, अशी सूचना दिल्याचं शाह यांनी सांगितलं. आणखी काही मुद्देही दोन राज्यांमध्ये आहेत. अशा मुद्द्यांचे निवारण हे सहा मंत्री करतील, असेही त्यांनी सांगितले.