आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १० स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने संपूर्ण राजकीय वर्तुळातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार) यांनीदेखील ट्विटरवरून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.
अजित पवार म्हणाले, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जीवनभर लढलेल्या, हिंदुत्वाचा नेमका अर्थ समाजाला सांगणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेचा विचार आणि संघटना टिकली पाहिजे, हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले.
या बंडानंतर या दोन्ही गटांत अनेक वाद होत असतात. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी हाच वाद टाळण्यासाठी शिंदे यांनी १६ नोव्हेंबरच्या रात्रीच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले; परंतु शिंदे स्मृतिस्थळावरून रवाना होताच ठाकरे गटातील नेत्यांनी स्मृतिस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. त्यावेळी खासदार अरविंद सावंत हेदेखील तिथे उपस्थित होते.