मुंबई | पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी पावसासह गारपीट होत आहे. दरम्यान एप्रिलच्या शेवटीही पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या राज्यात वादळी पाऊस आणि गारपीट होत असली तरी उन्हाचा चटका कायम असल्याने उन्हाच्या झळा बसत आहेत.
मागच्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे राज्याचील हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक हवामान असल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे. आज (दि. 26) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 1.5 किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. याचा फटका पश्चिम विदर्भ आणि परिसरावर होणार आहे. या प्रणालीपासून, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. वादळी पावसाला पोषक वातावरण झाल्याने आज (दि. 26) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.