पंढरपूर – वारकरी संप्रदायाचे आरोग्य जपण्याचे काम आषाढी वारी कालावधीत पंढरपूर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या शिबिरासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येकानेच सर्वश्रेष्ठ सेवाभावाच्या भावनेने आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. ड़ॉ. तानाजी सावंत यांनी येथे केले.आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर वारकरी भाविकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य विभागातर्फे २७ ते २९ जून दरम्यान पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ ह्या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीतील हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी शिस्तबद्ध व सूक्ष्म नियोजन करून परस्पर समन्वय ठेवावा. हे महाशिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासह संबंधित सर्व यंत्रणांनी परिपूर्ण प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी प्रा. ड़ॉ. तानाजी सावंत यांनी दिले. या बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त, आरोग्य सेवा डॉ. धीरजकुमार तर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते.
“शिबिरनिहाय पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक औषधसाठा व यंत्रसामुग्री, तयार ठेवावी. पालखी प्रस्थान ते पालखी प्रवास या दरम्यान ऑक्सिजन, रक्तसाठा, सुसज्ज १०८ रूग्णवाहिकेसह बाईक अँब्युलन्स सुस्थितीत उपलब्ध ठेवाव्यात. यामध्ये कसलीही तडजोड करू नये. चंद्रभागेच्या दोन्ही तीरावरही १० खाटांचे तात्पुरत्या स्वरूपात दवाखाने कार्यरत ठेवावे. महाशिबिरांच्या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह अग्निशमन यंत्रणा, फिरते शौचालय, फिजिओथेरपी यंत्रणा आदि सोयी सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. वारकरी भाविकांसाठी वाळवंटात स्वच्छ व मुबलक पेयजल पुरवठा करावा.” असे त्यांनी स्पष्ट केले.