मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होणार आहे. तर दुसरीकडे पर्यावरण प्रेमींकडून आरे वाचवा असे आंदोलनही सुरू करण्यात आले आहे. यातच आता मुंबई मेट्रोचे काम मार्गी लावण्यासाठी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तत्पूर्वी, या आंदोलनासाठी आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर झाल्याचा दावा केला जात आहे. यावरून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून आदित्य ठाकरे आणि इतर संबंधितांविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी करूत गुन्हे दाखल करावेत, असे आयोगाने म्हटले आहे.
अतुल भातखळकर आपल्या ट्विटमध्ये, कोणीही कितीही बालहट्ट केले तरी मेट्रो कारशेडचे काम मार्गी लावण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहे. अश्विनी भिडे यांची नियुक्ती पुरेशी बोलकी आहे, असे म्हटले आहे. यापूर्वी, आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत, असा टोला लगावला आहे.