Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापूर | धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

0

कोल्हापूर : कोल्हापुरात अद्यापही संतधार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आज वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी ४० फूट ८ इंच इतकी नोंदवण्यात आली आहे. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. या स्वयंचलित दरवाजामधून सुमारे आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे आज संध्याकाळी पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. राधानगरी धरणाच्या पाच स्वयंचलित दरवाज्यातून 7 हजार 140 क्यूसेक तर पावर हाऊसमधून 1400 क्यूसेक असा 8 हजार 540 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. सध्या धरणाच्या पाण्याची पातळी 347.20 फूट तर पाणीसाठा 8304.08 दशलक्ष घनफूट आहे. राधानगरीत एकूण पाऊस 2 हजार 376 मिलिमीटर झाल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून गुरुवारी दुपारी चार वाजल्यापासून 1 लाख 75 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा, कोयना, कृष्णा, पंचगंगा या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढत आहे. यामुळेच कर्नाटक आणि महाराष्ट्र जलसंधारण प्रशासनाने आपापसात ताळमेळ ठेवत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी अलमट्टीतून विसर्ग सुरू केला आहे.

यापूर्वी 2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला आलेल्या महापुराचे खापर अलमट्टी धरणाच्या फुगवट्यावर फोडले गेले. मात्र आता कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी, कुंभी, कासारी यासह अन्य धरणे भरलेली नाहीत. तरीही कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर शहरात पूररेषेत झालेली बांधकामे याला कारणीभूत आहेत. मात्र जाणीवपूर्वक या बांधकामाकडे दुर्लक्ष करून महापुराचे खापर अलमट्टी धरणाच्या फुगवट्यावर फोडले गेले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल ही कोल्हापूरकर विचारत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.