कोल्हापूर : महापालिकेचे 2020 – 21 या वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज, शुक्रवारी तब्बल तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सादर झाले. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांनी महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे सुपूर्द केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
सोशल डिस्टन्स पाळत नगरसेवक सहभागी झाले. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अव्वल शिलकेसह महसुल व भांडवली अपेक्षित जमा 693 कोटी 17 लाख तर खर्च 610 कोटी 9 लाख इतका अपेक्षित आहे. 2019 -20 चे सुधारित व 2020 – 21 चे नवीन असे हे अंदाजपत्रक आहे. यात सावित्रीबाई फुले रूग्णालयात ऑपरेशन थिएटर, लॅमिनेटर एअर फ्लो मशिन, शहरात व्हेल पार्किंग, ग्रीन एनर्जी, महिला बचत गटासाठी मॉल, महापालिकेच्या सुविधांसाठी मोबाईल ऍप, केएमटीमध्ये महिलांसाठी विशेष कक्ष, पंचगंगा घाट व तेथील विद्युत व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी मिनी विरंगुळा केंद्र, वर्दळीच्या ठिकाणी एअर फिल्टर, डट्री स्पॉट उपक्रम, अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प, सेफ सिटी प्रकल्प टप्पा दोन या कामांसाठीच्या तरतुदी संकल्पात केल्या आहेत.