कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या काही गावांवर दावा सांगितल्यानंतर या वादाची ठिणगी पडली. त्यानंतर महाराष्ट्रातील काही वाहनांची कर्नाटकमध्ये तोडफोडही करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करत सीमावाद सोडवण्यासाठी केंद्राने मध्यस्थी करावी, अशी मागणी केली.
तसेच यासाठी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी केंद्राने मध्यस्थी करावी, असे प्रयत्नही चालू केले. अशातच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीविषयी सांगताना महाराष्ट्रातील खासदारांमध्ये असलेले मतभेद उघड केले आहेत. दिल्लीत सीमावादावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षांतील खासदारांनी अमित शहांची भेट घेतली; परंतु काही गोष्टींवरून मतभेद आणि आक्षेप घेतले गेल्याने ही आजची भेट झाली नाही, असे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
बारणे हे अमित शहा यांची भेट घेण्याविषयी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यायला हवे. महाराष्ट्रातील खासदारांनी सीमावादावर अमित शहा यांची भेट घेण्याचे ठरवले त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी आणि धैर्यशील माने, सुप्रिया सुळे(Supriya Sule)यांच्या विनंतीला मान देऊन शिष्टमंडळासोबत जात होतो. मात्र ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आम्हाला सोबत घेण्यासाठी आक्षेप घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील खासदारांची आणि अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही; परंतु यावेळी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केला होता, असेदेखील बारणे यांनी सांगितले.