मुंबई | शिवसेनेतून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. शिवसेनेचं नाव घेण्याचीही नैतिकता त्यांच्याकडे राहिलेली नाही. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हायजॅक करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तेव्हा बंडखोर आमदारांमध्ये हिम्मत असेल, तर आम्ही शिवसेना सोडली म्हणून त्यांनी जाहीर करावं, असे खुले आव्हान शिवसेना पक्षाचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी येथे दिले.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दरडीचा ही धोका निर्माण झाल्याने या घाटाची पाहणी करण्यासाठी खासदार राऊत हे आज, मंगळवारी चिपळुणात आले होते. यावेळी राजकीय घडामोडीवर बोलताना राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला होता.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, अख्ख्या देशाला लांच्छनास्पद ठरेल असे राजकारण भाजप पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडले. दुर्देवाने शिवसेनेचे 40 आमदार त्याला बळी पडले. सत्तेची लालसा व मुख्यमंत्रीपदाचा हव्यास त्याला कारणीभूत ठरला. त्यासाठी कित्येक कोटींची उधळण झाली. प्रत्येकी 50 ते 70 कोटी दिल्याची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात चार हजार कोटींहून अधिक रुपयांचा बाजार मांडला गेला मात्र अशा राजकारणाने लोकशाही शिल्लक राहणार नाही असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.