शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना असे दोन पक्ष निर्माण झाले आहे. या दोन्ही पक्षात आत विस्तवही जात नाही. अशातच चिपळूण तालुक्यातील पेढे येथील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेची सोबत घेतली आहे. मात्र, पेढे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेच ठाकरे व शिंदे गट एकत्र आले आहेत. हे दोन्ही गट एकत्र आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार लढत होत आहे.
पेढे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची नेहमीच एकहाती सत्ता राहिली आहे. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत येथील शिवसेनेचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे. त्यातच काही महिन्यापूर्वी शिवसेनेत कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने येथील निवडणूक दोन्ही गटासाठी आव्हानात्मक ठरली आहे.
सरपंचपदासाठी शिवसेनेच्या मानसी भोसले व राष्ट्रवादीच्या आरूषी शिंदे यांच्यात मोठी लढत होत आहे. येथे ११ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या असून सदस्यांच्या ८ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहे. येथे निवडणुकीच्या प्रचारात दिवसागणिक रंगत येत आहे. वाडीनिहाय बैठका घेऊन एकहाती मतदान व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटीसह सोशल मीडियावरूनही प्रचाराची रणधुमाळी उठवली जात आहे.
चिपळूण तालुक्यातील काही ग्रामपंचातींमध्ये शिंदे आणि ठाकरे गट भिडले असताना पेढे येथे मात्र दोन्ही गटांनी ग्रामपंचायतीसाठी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या विश्वास सुर्वे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्थितीत पुन्हा ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे.