खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टानं समन्स बजावलं आहे. १ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच मुद्द्यावर बोलताना आज संजय राऊत यांनी कर्नाटकात त्यांच्यावर हल्ल्याचा कट आखला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. ते मुंबई प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. या आरोपांमुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गट आणि भाजपा आमने-सामने येणार आहे/
“कोर्टात सीमावादावर सुनावणी, मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जतमधील गावांवर दावा, काल कर्नाटकातील एका संघटनेनं महाराष्ट्रातील गावात येऊन झेंडे फडकावले आणि मला आलेले समन्स. यामागची क्रोनोलॉजी समजून घेण्यासारखी आहे. कर्नाटकात मला बोलावून माझ्यावर हल्ल्याचा कट आखला गेला आहे. माझ्या अटकेची तयारी केली जात आहे. पण मी घाबरणारा नाही. मी तिथं जाणार”, असं संजय राऊत म्हणाले.
“आमच्या काश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तींनी ज्यापद्धतीनं झेंडे फडकावले. त्याच पद्धतीनं कर्नाटकातील संघटनांचे लोक महाराष्ट्रात घुसत आहेत. यांच्यावर खरंतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. हीच परिस्थिती जर कायम राहिली तर इथंही रक्तरंजित युद्ध देशाच्या गृहमंत्र्यांना हवं आहे का? माझं अमित शाह यांना आवाहन आहे की त्यांनी यात लक्ष घालावं नाहीतर परिस्थिती बिघडेल”, असं संजय राऊत म्हणाले.