सीमाभागात १ नोव्हेंबर हा दिवस मराठी बांधव ‘काळा दिवस म्हणून पाळतात. या ‘काळा दिन’ला समर्थन देण्यासाठी कोल्हापुरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज ‘मशाल फेरी’ काढण्यात आली. ही मशाल फेरी बेळगावकडे निघाली असताना कर्नाटक पोलिसांनी दडपशाहीचा अवलंब करत शिवसैनिकांना कर्नाटकच्या सीमेवर दूधगंगा पुलावर रोखले. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात पुणे-बंगळुरू महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.
‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.शिवसैनिकांच्या ठिय्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तासभरासाठी ठप्प पडली होती. अखेर सीमाभागात जाणाऱ्या दूधगंगा नदीला वंदन करून शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार आणि कर्नाटक पोलिसांचा निषेध केला. ‘शिवसेना झिंदाबाद’ यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या वतीने ‘काळा दिन’मध्ये सहभागी होऊन मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी ‘मशाल फेरी’ काढली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळी वंदन करून मशाल फेरी बेळगावकडे निघाली. शांततेच्या मार्गाने सीमाबांधवांच्या पाठीशी राहण्यासाठी शिवसेनेच्या या ‘मशाल फेरी’ला कर्नाटक पोलिसांनी दडपशाही करीत रोखले. हा लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचा अवमान आहे.
आजपर्यंत मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने अत्याचार केले आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्रात येण्यासाठी मराठी भाषिक आपल्या जीवाची पर्वा न करता लोकशाहीमार्गाने लढा देत आहेत. त्यांच्या पाठीशी महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिक असून, १ नोव्हेंबरच्या काळादिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ‘मशाल’ सीमाभागात पोहोचणारच!’’ असा निर्धार जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी व्यक्त केला.