राज्य आणि केंद्र सरकारकडून उपाययोजना होत नसल्याने कांद्याचे दर रोजच घसरत आहेत. दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाला असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा मुद्दा उचलून धरत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर मंगळवारी जोरदार आंदोलन केलं.गळ्यात कांद्याच्या माळा घालून हे आमदार पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. ‘सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी’, ‘मिळालाच पाहिजे…मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला भाव मिळालाच पाहिजे’ ‘गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात’ अशा घोषणा या आमदारांनी दिल्या.
या आंदोलनात दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे सहभागी झाले होते. याशिवाय दोन्ही सभागृहातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. विधानसभेतही कांदा आणि इतर शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी मुद्दा उचलण्यात आला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले की कांदा निर्यातीला परवानगी दिली पाहिजे, कारण काही देशांत कांद्याला प्रचंड मागणी आहे असे.
शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त करत मिंधे सरकारवर टीका केली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह 14 मंत्री ठाण मांडून बसले होते. मात्र या सगळ्यांनी प्रचाराकडे जास्त लक्ष देताना जनतेच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली आहे. ‘सरकारला फक्त 40 लोकांना खूश ठेवायचे आहे. सरकारने जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसून येत आहे.’ अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.