ठाणे | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ४० आमदार बरोबर घेऊन शिवसेनेत फूट पाडली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बंडखोरी करून मुंबई-सुरत-गुवाहटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करणाऱ्या शिंदे गटावर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केलेले नेते विकले गेले, पण जनता विकली गेली नाही, असे म्हणत विचारे यांनी शिंदे गटावर हल्लबोल केला.
ज्या शिवसेनेने रक्ताचे पाणी करून शिवसेना वाढवली, सामान्यातील सामान्य माणसाला ज्या शिवसेनेने नेते केले. तीच माणसं आज शिवसेना संपवायला निघाली आहेत, असा घणाघातही राजन विचारे यांनी केला. गद्दार शिंदे गटाकडून शिवसेना आणि शिवसेनेच्या राज्यातील गावागावांत असणाऱ्या शाखा संपवल्या जात आहेत, अशी टीकाही राजन विचारे यांनी केली.
आज जरी तुम्ही शिवसेना पक्ष, चिन्ह आणि एखाद्याचा बाप चोरला असला तरी ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आज जरी एकनाथ शिंदे यांना हे चिन्ह आणि पक्ष मिळाला असला तरी राज्यातील जनता तुमच्यासोबत नाही. आगामी निवडणुकीत जनताच तुम्हाला तुमची जागा निवडून देईल. विचारे यांनी शिवसेनेचा इतिहास आणि त्यासाठी लोकांनी आपल्या आयुष्याची कशी वाताहात करून घेतली त्या गोष्टींचीही आठवण त्यांनी शिवसेनेतील नेत्यांना करून दिली आहे.