मुंबईला हानिकारक प्लास्टिक पासून मुक्ती देण्यासाठी मनपा आता काही कडक उपाययोजना करीत आहे. त्याच अनुषंगाने पालिकेने मुंबईत प्लास्टिकचा जास्त वापर करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यापुढे हॉटेलमधून जेवण व अन्य खाद्यपदार्थ पार्सल करून नेण्यासाठी पुनर्वापर करता येणाऱ्या डब्यांचा अथवा स्टील डब्यांचा वापर करावा लागणार आहे. तसे निर्देश पालिकेकडून हॉटेल व्यवसायिकांना देण्यात येणार आहेत.
पुढील आठवड्यात मुंबई महापालिका प्रशासकीय अधिकारी व हॉटेल व्यवसायिक, आहार संघटनेची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उपआयुक्त संजोग कबरे यांनी ही माहिती दिली. मुंबई महापालिकेने पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिकवर २०१८मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून पालिकेने हानिकारक प्लास्टिकची निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. हानिकारक प्लास्टिक वापरल्याबद्दल अनेक व्यापारी, दुकानदार यांच्यावर जप्तीची व दंडात्मक कारवाई पालिकेने केली आहे.
मात्र मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेने मुंबईत टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यात आले. त्यांना काही बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे पालिकेची प्लास्टिकविरोधी कारवाई थंडावली होती. मात्र आता सर्व सुरळीत सुरू झाल्याने पालिकेने पुन्हा एकदा प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.