नाशिक | विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून नेमके कोण बाजी मारणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे; परंतु निकाल जाहीर होण्यापूर्वीच अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स संगमनेरमध्ये झळकले आहेत. त्यामुळे त्या पोस्टर्सची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.
माहितीनुसार, ‘जीत’ सत्याची विजय नव्या पर्वाचा, अशा आशयाचे पोस्टर्स संगमनेरमध्ये लागले आहेत. तसेच, नाशिक पदवीधर मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. असे पोस्टर्स नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी लावले आहे. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, नगरची जागा ही मविआबरोबरच भाजपसाठीसुद्धा प्रतिष्ठेची बनली आहे.
भाजपने सत्यजित तांबे यांना पक्षाच्या पातळीवरुन अधिकृत पाठिंबा दिला नसला, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना मतदानासाठी आवाहन केले गेले आहे. त्यामुळे या जागेचा निकाल सत्यजित तांबे यांची पुढची राजकीय वाटचाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे, असे समजते. सध्या कॉंग्रेसची बंडखोरी करत सत्यजीत तांबे जिंकणार की ठाकरेंचा पाठिंबा मिळवणाऱ्या शुभांगी पाटील बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे