विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याविरोधात भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “संभाजी महाराजांबद्दल आम्हीही भावनाशील आहोत. पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्यासाठी मोठा संघर्ष केला. त्या शिवाजी महाराजांचा भाजपच्याच नेत्यांनी तसेच राज्यपालांनी अपमान केला. त्यावर भाजप आणि सध्याचे मुख्यमंत्री का गप्प आहेत?” असे त्यांनी विचारले.
पुढे राऊत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वाद असू नये. महाराष्ट्राच्या इतिहासात या दोन छत्रपतींचे मोठे योगदान आहे. तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. जे संभाजी महाराजांच्या अपमानावर बोंबा मारत आहेत. ते शिवाजी महाराजांच्या अपमानावर मूग गिळून गप्प का आहेत? राज्यपालांच्या दारावर जाऊन ते आंदोलन का करत नाहीत? राज्यपाल हटावची घोषणा का करत नाही? राज्यपालांना माफी मागावी असे का सांगत नाही? त्यांचे दुसरे जे दिल्लीतील प्रवक्ते आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यावर का बोलत नाही?” असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले.
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. “पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे आणि लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय किंवा कायदा नाही. केसरकरांनी २०२४ मध्ये कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी.” असा इशारा त्यांनी दिला.