चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेमध्ये बंडाचे हत्यार उपसून भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता भाजपने त्यांचा खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघाला लक्ष्य केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुढील सहा ते सात महिन्यात शिंदे सरकारमध्ये असंतोषाचा स्फोट होईल, असे भाकितही त्यांनी वर्तवले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुषमा अंधारे )यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
‘शिंदे गटाची गरज आता भाजपसाठी संपलेली आहे. ती फक्त सरकार स्थापन करण्यासाठी होती. भाजप यात यशस्वी ठरली आहे. बीकेसी मैदानावर मेळावा घेतला तेव्हा शिंदे गटाची किती ताकद आहे, यात शिंदे गट उघडा पडला आहे. त्यामुळे भाजप आता शिंदे गटाला गृहीत धरत नाही, त्यांच्या मुळावर उठला आहे. भाजपने आता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रताप सरनाईक यांना मधल्या काळात थोडी सवलत मिळाली होती. जर सरनाईक यांनी आपला मतदारसंघ सोडला नाहीतर ईडीकडून संपत्तीवर टाच आणली जाईल, असा दावा अंधारे यांनी केला.
तसंच, आढळराव पाटील यांच्या मतदारसंघामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दौरा केला होता. एवढंच नाहीतर संजय शिरसाट हे शिंदे गटामध्ये सामील झाले होते. ते गुवाहाटीला गेले होते. शिरसाट हे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलले होते. ज्या मुलांना दत्तक घेतले त्यांची काळजी भाजप घेत आहे. पण त्यांची मुलं उघडी पडली आहे. त्यामुळे असंतोषाच्या राजकारणाचा लवकरच भडका उडेल. हे सरकार फार फार ५ ते ६ महिने टिकणार नाही, असा दावाही अंधारे यांनी केला.