जलजीवन मिशन योजना; मोडनिंब येथे ठिय्या आंदोलन सुरुजलजीवन मिशन योजनेचे काम सुरू करा ; वेताळ परिवाराची मागणी
मोडनिंब (ता.माढा) येथील बहुचर्चित जलजीवन मिशन योजनेचे काम सध्या रखडले आहे. मोडनिंब शहराची संभाव्य पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी या योजनेचे काम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. लेखी निवेदन देऊन देखील काम सुरू न केल्याने ग्रामदैवत श्री वेताळ परिवाराने ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वेताळ परिवाराच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे मोडनिंबच्या जलजीवनास गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. रखडलेले काम तातडीने सुरू करावे यासाठी वेताळ
परिवाराच्या वतीने २९ एप्रिल रोजी जलजीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते.यावेळी मनसेचे प्रशांत गिड्डे, अनिल शिंदे, हनुमंत कुंभार, रमेश शिरसट, प्रकाश गिड्डे, ऋषिकेश कोठावळे, मारुती वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. ‘जल जीवन’चे काम तातडीने सुरू करून मोडनिंबकरांची तहान भागवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.शाखा अभियंता गुणवंत करळे यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. शिष्टमंडळाशी चर्चा करुन आंदोलन थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली.आंदोलनात प्रकाश गिड्डे, धनाजी लादे, हनुमंत कुंभार, अनिल शिंदे, ऋषिकेश कोठावळे, सुरेश जाडकर, राजेश निंबाळकर, अॅड. गणेश सुर्वे, दीपक सुर्वे, शंकर कोठावळे, जयवंत ओहोळ, हनुमंत यादव, चंद्रकांत गिड्डे आदी सहभागी होते. आंदोलनास माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी उपस्थिती दर्शवत पाठिंबा दिला.शाखा अभियंता करळे यांनी आंदोलन प्रमुख प्रकाश गिड्डे यांना आंदोलनस्थळी भेटून दिली. यानंतर गिड्डे यांचे समाधान झाले नाही. शहरातील रखडलेले काम अगोदर सुरू करा, अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.
येवती तलावात मुबलक पाणी असूनही मोडनिंब शहराला आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, ही दुर्दैवी स्थिती आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ हे स्वप्न अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. रखडलेले काम तात्काळ सुरू व्हावे, ही मोडनिंबकरांची एकमुखी मागणी आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदारांसोबत संयुक्त बैठक घेऊन काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी होकार दिला गेला असला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, संबंधित अधिकाऱ्यांनाच हे काम सुरू होऊ नये असे वाटते का? जोपर्यंत हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आमचे ठिय्या आंदोलन सुरुच राहील.”
-प्रकाश गिड्डे, प्रमुख नेते, वेताळ परिवार
ज्यांनी काम अडवले त्यांच्याशी व आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणार आहे. फिल्टर कडील काम चालू करावे, पूर्वी राबविण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या पाईपलाईनचा नकाशा मिळावा यासंदर्भात चर्चा झाली.
-गुणवंत करळे, उपअभियंता, जलजीवन प्राधिकरण