Latest Marathi News

BREAKING NEWS

इस्रायल-इराण संघर्ष पेटला

0


हल्ले-प्रतिहल्ले सुरू, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्राचा मारा
जेरूसलेम : वृत्तसंस्था

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही देशांच्या क्षेपणास्त्रांच्या पावसामुळे जग चिंतेत पडले आहे. शुक्रवारी पहाटेपासून क्षेपणास्त्रांचा मारा सुरू झाला असून, यामुळे युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणमधील सहा शहरांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढविला. पहाटे एअर स्ट्राईक घडवल्याने इराण हादरले. त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. आधीच गाझा, लेबनॉन, सीरिया आणि येमेनमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यात इस्रायल-इराण यांच्यात संघर्ष पेटल्याने संघर्षाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


इस्रायलने शुक्रवारी दिवसभरात इराणवर तिस-यांदा हल्ला चढवला. पहाटे शेकडो लढाऊ विमाने इराणमध्ये घुसली आणि तेथील अण्वस्त्र कार्यक्रमावर हल्ले चढविले. इराणची राजधानी तेहरानसह सहा शहरांत एअर स्ट्राईक घडवून आणला. यात इराणचे महत्त्वाचे अण्वस्त्र शास्त्रज्ञ ठार झाले. तसेच अण्वस्त्र कार्यक्रमाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता इराणने इस्रायलवर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. आता युद्ध भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देश सोडल्याचे वृत्त आहे. इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणमध्ये २०० पेक्षा जास्त लढाऊ विमाने घुसविली होती.


इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने शनिवारी इस्रायलमधील तेल अवीव आणि जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांमध्ये हवाई हल्ला केला. त्यामुळे शनिवारी पहाटे सायरन वाजायला सुरुवात झाली. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, इराणची क्षेपणास्त्रे हवाई संरक्षणाद्वारे रोखली जात आहेत. इराणकडून मोठ्या प्रमाणात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यातील बहुतांश थांबविण्यात आल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. मात्र, सर्व क्षेपणास्त्रे थांबू शकली नाहीत आणि काही तेल अवीवमध्ये पडली.
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या इस्रायलने दिलेली नाही. तेल अवीवमध्ये काही ठिकाणी बचाव पथके सक्रिय असल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, इराणने इस्रायलच्या नागरी लोकसंख्येच्या केंद्रांवर क्षेपणास्त्रे डागून लाल रेषा ओलांडली आहे. इस्रायल त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असे ते म्हणाले.

. इस्रायलकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाठवण्याची चर्चा आहे. तेहरानच्या विमानतळावर स्फोटाचा आवाज ऐकू आला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या घराजवळ आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या घराजवळ शनिवारी सकाळी आकाशात खळबळ उडाली आहे. इराणच्या एअर डिफेन्सने इस्रायलचे ड्रोन पाडले आहे. तत्पूर्वी इराणने शुक्रवारी रात्री दोन हवाई हल्ले केल्यानंतर शनिवारी हवाई हल्ल्याची तिसरी लाट आणली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर युद्ध सुरू केल्याचा आरोप केला.

शुक्रवारी इस्रायलकडून इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर हा संघर्ष सुरू झाला. इराणच्या लष्करी आस्थापना, अणुकेंद्रे, कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. इराणवरील इस्रायलचे हल्ले आणि इराणला प्रत्युत्तर यामुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे. गाझा, लेबनॉन, सीरिया आणि येमेनमध्ये आधीच संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत परिसरात प्रचंड अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.