Latest Marathi News

BREAKING NEWS

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे लोकार्पण

0

उंच पुलावर फडकला तिरंगा
श्रीनगर : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जून रोजी जगातील सर्वांत उंच चिनाब रेल्वे पुलाचे लोकार्पण केले. यामुळे गेल्या ३ दशकांपासून सुरू असलेली प्रतिक्षा संपली असून यामुळे काश्मीर उर्वरित भारतासाठी सर्व ऋतूंमध्ये जोडला जाणार आहे. काश्मीर खो-यात चिनाब नदीवर बांधलेला हा पूल अभियांत्रिकीचे एक अतुलनीय आणि बदलत्या भारताचे उदाहरण आहे. हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. विशेष म्हणजे हा पूल ४० किलो स्फोटके आणि ८ रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाचा सामना करू शकतो.

रेल्वे पायाभूत सुविधेसाठी
तब्बल १३३ वर्षे लागली
काश्मीरमध्ये इतक्या मोठ्या रेल्वे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तब्बल १३३ वर्षे लागली. १९८३ मध्ये इंदिरा गांधींनी जम्मू-उधमपूर रेल्वे मार्गाची पायाभरणी केली होती. ५३ किमी लांबीचा रेल्वे मार्ग ५० कोटी रुपये खर्चून ५ वर्षांत पूर्ण करायचा होता. परंतु तो बांधण्यासाठी २१ वर्षे लागली आणि ५१५ कोटी रुपये खर्च झाले. शिवालिक टेकड्या कापून २० बोगदे आणि १५८ पूल बांधण्यात आले.

१९९४ मध्ये सुरू केला
यूएसबीआरएल प्रकल्प
१९९४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक म्हणजेच यूएसबीआरएल प्रकल्प सुरू केला. सुरुवातीला त्याचे बजेट २.५ हजार कोटी रुपये होते, जे २०२५ पर्यंत ४२.९३ हजार कोटी रुपये झाले. २००२ मध्ये कारगिल युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी यूएसबीआरएलला केंद्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले. म्हणजेच केंद्र सरकारने या प्रकल्पाचा खर्च उचलला. २००३ मध्ये सरकारने काश्मीर खो-याला देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी चिनाब पूल बांधण्याचा निर्णय घेतला. हा पूल २००९ पर्यंत पूर्ण होणार होता. तथापि, हे होऊ शकले नाही.

डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या
काळात दोन्ही टोकांवर रेल्वे मार्ग
डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात उधमपूर ते काश्मीरपर्यंत दोन्ही टोकांवर रेल्वे मार्ग टाकण्यात आले होते. परंतु त्यांच्यामध्ये रेल्वे मार्ग बांधण्यात आला नाही. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएसबीआरएल प्रकल्पासाठी प्रोऍक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लीमेंटेशन म्हणजेच प्रगती उपक्रम सुरू केला.

एकूण १४८६ कोटी
खर्चून उभारला पूल
प्रगती उपक्रमांतर्गत पंतप्रधान मोदींनी स्वत: चिनाब पुलाच्या बांधकामाचे निरीक्षण केले आणि आवश्यक निधी मंजूर केला. सुमारे २ दशकांनंतर १४८६ कोटी रुपये खर्चून चिनाब नदीवर हा पूल पूर्ण झाला. यासह काश्मीरला थेट भारताशी जोडण्याचे स्वप्नही पूर्ण झाले.

भूकंप, पूर, बर्फवृष्टी
सहन करण्याची क्षमता
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब ब्रिज भूकंप, पूर, हिमवर्षाव आणि स्फोटकांपासून संरक्षण करण्यासाठी विशेषत: डिझाइन करण्यात आला. पुलाचा परिसर भूकंप झोन चारमध्ये येतो. परंतु तो भूकंप झोन पाचसाठी डिझाईन करण्यात आला. म्हणजेच भूकंपाच्या दृष्टीने तो खूप सुरक्षित आहे आणि रिश्टर स्केलवर ८ तीव्रतेच्या भूकंपाचा सामना सहजपणे करू शकतो.

१२० वर्षांसाठी बांधला पूल
हा पूल पुढील १२० वर्षांसाठी बांधण्यात आला. चिनाब रेल्वे पूल बांधण्यासाठी एकूण १७ खांब बांधण्यात आले. त्याचा सर्वात उंच काँक्रीट खांब ४९.३४३ मीटर आहे आणि त्याचा सर्वात उंच स्टील खांब सुमारे १३० मीटर आहे. हा स्टील खांब बांधण्यासाठी २९ हजार टनांपेक्षा जास्त स्टील वापरण्यात आले.

डीआरडीओच्या
मदतीने बांधला पूल
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओच्या मदतीने हा पूल स्फोट भारासाठीदेखील डिझाइन करण्यात आला आहे. म्हणजेच ४० किलो किंवा त्याहून अधिक स्फोटके असली तरी स्फोटाचा या पुलावर कोणताही परिणाम होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.