इंदू मिल इथं बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक होतंय, पण त्या जागी जगातलं सर्वात मोठं वाचनालय व्हायला हवं – राज ठाकरे
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, असा महाराष्ट्र कधीही नव्हता, विरोध असेल की पाठिंबा असेल सर्व आमने सामने असायचं अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केलीय.
पनवेलमध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. यात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या प्रदर्शनानिमित्ताने विधानभवनात गेलो होतो, खाली सर्व आमदार बसले होते, पण कोणत्या पक्षात हेच कळत नव्हतं. आता कोणी आमदार भेटायला आला तर त्याला विचारावं लागतं आता कोणत्या पक्षात आहेस असं राज ठाकरे म्हणाले.
मनसेचा कारभार हाती घेऊन पाहता का असा चिमटा त्यांनी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही काढला. राज्यातल्या राजकारणावर 22 मार्चला गुढीपाडव्याच्या सविस्तर बोलणार असं राज ठाकरेंनी म्हटलंय. कोणताही टिझर ट्रेलर देणार नाही असा टोला त्यांनी मारला. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या वादावाडीवरून उद्धव ठाकरे सह शिंदे गटाला टोला लगावला होता.
राज्यात उभारण्यात येणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्याबाबतही राज ठाकरे यांनी परखड भूमिका मांडली आहे. आपल्याकडे स्मारक म्हणजे पुतळे अशी संकल्पना असल्याचं ते म्हणाले. पण वर्षभर पुतळ्यांकडे कोणी बघतही नाही. मुंबईतल्या इंदू मिल इथं बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक होतंय, पण त्या जागी जगातलं सर्वात मोठं वाचनालय व्हायला हवं होतं. समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाची गरज काय? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराजांचे गड किल्ले हेच त्यांचे स्मारक असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.