पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्घाटन आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर रिक्षांसाठी अनुदान वाटप
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्घाटन आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर रिक्षांसाठी अनुदान वाटप करण्यात आले. शहरात ई-रिक्षा घेणाऱ्या १० महिलांना ई-रिक्षासाठी मिळणारे अनुदान वगळून इतर रक्कम लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले, देशपातळीवर इलेक्ट्रिक रिक्षासाठी अनुदान देण्यात येत आहे. ई-रिक्षासाठी केंद्र शासनाचे आणि महानगरपालिकेचे मिळून एकत्रित १ लाख अनुदान मिळते. त्यामुळे साधारण एक रिक्षेसाठी चालकाला ३ लाख खर्च करावा लागेल, मात्र इंधनाची बचत होत असल्याने कुटुंबासाठी जास्त उत्पन्न मिळू शकेल. शहरातील प्रदूषण कमी करताना उत्पन्न वाढणार असल्याने रिक्षा चालकांनी इलेक्ट्रिक रिक्षेकडे वळावे. रिक्षा थांब्याजवळ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत महानगरपालिकेने नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहरात मेट्रोचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर २ लाख नागरिक इतर वाहनाऐवजी मेट्रोचा पर्याय वापरातील. तिसऱ्या टप्प्यानंतर ही संख्या ४ लाखावर पोहोचेल त्यामुळे प्रदूषण आणखी कमी होईल. प्रवाशांना घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी ई रिक्षाचा उपयोग होईल. रिक्षासोबत इतर वाहनांसाठीही सीएनजी आणि इलेक्ट्रिकचा वापर करणेही गरजेचे आहे, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
शहरातील चौकात बसविलेल्या मिस्ट बेस्ड फाउंटनमुळे हवेतील धूलिकण कमी होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे, ‘एआरएआय’चे जितेंद्र पुरोहित, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, पर्यावरण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे प्रतिनिधी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आणि रिक्षा मालक उपस्थित होते.