Latest Marathi News

BREAKING NEWS

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते डीईएस पुणे विद्यापीठाचे उद्घाटन

0

पुणे, १५ ऑक्टोबर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित डीईएस पुणे विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले. स्वायत्त विद्यापीठांनी विश्व, समाज आणि उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात नव्या शैक्षणिक प्रवाहांचा विचार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबत देशाच्या वैभवशाली गतकाळाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात अभिमान निर्माण करणारे शिक्षण देणे अपेक्षित आहे. जगाला असलेली कुशल युवा मनुष्यबळाची गरज लक्षात घेता देशाच्या तरुण वर्गाला भाषा, कौशल्य आणि देहबोलीविषयी प्रशिक्षित करणारे शिक्षण स्वायत्त विद्यापीठांनी द्यावे. जगातील नवे शैक्षणिक प्रवाह ओळखून विद्यापीठांनी अभ्यासक्रमाची रचना करणे आवश्यक आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन आणि नावीन्यतेशिवाय देश श्रीमंत होऊ शकणार नाही. गेल्या २ वर्षात असे संशोधन वाढत असून ही समाधानाची बाब आहे. त्यासोबत मातृभाषेत शिक्षण देण्यावरही भर द्यावा. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत त्याला अभ्यासक्रमाची माहिती देणारे सॉफ्टवेअर निर्माण करण्यात येत आहे. यापुढे तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठी भाषेत असतील, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली. पुढील वर्षी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी न करणाऱ्या विद्यापीठांना संलग्नता नाकारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज, एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ.रविंद्र आचार्य, सचिव धनंजय कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रसाद खांडेकर आदी उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज म्हणाले, समाजातील सर्व घटकांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने प्रयत्न केला आहे. त्यासोबत बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षणावरही भर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानलालसा आणि शोधकवृत्ती निर्माण व्हावी असा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासोबत सांस्कृतिक-सामाजिक मूल्याच्या जपणूक, समानता आणि स्वावलंबनाचे शिक्षण देण्यावरही भर देण्यात येत आहे, असे त्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.