आमदार आदित्य ठाकरे यांच्या कारला दुचाकीने धडक दिल्याची घटना काल शिवसेना भवनासमोर घडली होती. मात्र या घटनेनंतर भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न तर नाही ना? याची चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. सिंधुदूर्गात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
आजच्या सामनात आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कारटा अस वाक्य वापरले गेले आहे. ते आपल्या मुलाला जी वागणूक देतात, ती इतर शिवसैनिकांना देत नाही. पूजा चव्हाण प्रकरणी जो नियम संजय राठोड यांना, तो नियम दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना का नाही? दुसऱ्याला सल्ले देण्यापेक्षा संजय राऊत यांनी स्वतःच्या मालकाला सल्ला द्यावा, असे नितेश राणे यावेळी म्हणाले.
समान नागरी कायद्यावर ठोस भूमिका घेण्याची उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत नाही. सेना भवनात उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मुस्लिम लोक आले होते. मग आता शिवसेना भवनाचे शुद्धीकरण करणार का? तुम्ही बाळासाहेबांचा फोटो काढा आणि भोंगा लावा. तुमच्यामध्ये बाळासाहेबांचं रक्त असेल, तर समान नागरी कायद्याला समर्थन देऊन दाखवा. उद्धव ठाकरेंनी समान नागरी कायदा मातोश्रीत आणावा, असे आव्हानही नितेश राणे यांनी दिले.