Latest Marathi News

BREAKING NEWS

ग्लोबल टिचर पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकाच्या राजीनाम्याबाबत गूढ

0

 

सुमारे सात कोटी रुपयांचा पुरस्कार मिळविण्याबरोबरच क्‍यूआर कोड प्रणाली विकसित करणारे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे 7 जुलैला त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे मंगळवारी राजीनामा आला असून राजीनामा अर्जात त्यांनी काहीच कारण नमूद केलेले नाही. त्यामुळे डिसले गुरुजींनी दिलेल्या राजीनाम्याबाबत गूढ कायम आहे.

सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले गुरुजी यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते “डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर वार्डची तयारी करण्यातच आपला कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली. त्यानंतर त्यांच्यामागे शिक्षण विभागाचा चौकशीचा ससेमिरा लागला. तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करून अहवाल तसाच ठेवला होता.

विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडला आणि स्वतंत्र चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे कारवाईची शिफारस केली. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. मात्र अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवण्यात आला होता.

कागदपत्रांची पूर्तता न करताच त्यांनी रजा मागितली होती. त्यावेळी त्यांच्या रजेचा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड त्यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजा मिळाली होती. त्याचवेळी त्यांनी शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोपही केला होता. पण, त्यांना त्याचा पुराव्यानिशी खुलासा करण्याचे पत्र जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले. क्‍युआर कोड शिक्षण प्रणाली विकसीत करणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना दोन वर्षांपूर्वी ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला. आता शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजींमध्ये यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.