मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर नुकत्याच झालेल्या ‘ईडी’च्या कारवाईसंदर्भात ”दिल्लीकरांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केल्याचे संभाषण व्हायरल झाल्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते,” असे सांगत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री किरीट सोमय्या यांनी आयकर झाले, ईडी झाली, आता राज्य सरकार 1500 कोटींच्या कॉण्ट्रक्ट घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, भावना गवळी, प्रताप सरनाईक यांच्याबाबत प्रश्न विचारताच त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळत काढता पाय घेतला.आज सकाळी कोल्हापुरात दाखल झालेल्या किरीट सोमय्या यांनी कडक सुरक्षाव्यवस्थेत श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन जुन्याच आरोपांवर बोलत शिळ्या कढीला ऊत आणला.
सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत आमदार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयावर तेच ते आरोप केले. यावेळी पत्रकारांनी खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक यांच्यावर तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत पुढे काय कारवाई झाली? त्यांचा पाठपुरावा कधी करणार? असा प्रश्नांचा भडीमार पत्रकारांनी करताच सोमय्या हे मूळ प्रश्नाला बगल देत पुन्हा तेच तेच आरोप करू लागले.