विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणखी 18 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. ही मनसेची सातवी यादी असून, विशेष म्हणजे मुंबईतील माहिम मतदारसंघात पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत असताना महायुतीसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. अशा परिस्थितीत राज ठाकरेंनी नव्या यादीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंनी अशा व्यक्तीला तिकीट दिलं आहे ज्याला भाजपकडून निवडणूक लढवायची होती, पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे आता मनसेने त्या व्यक्तीला तिकीट देऊन महायुतीच्या उमेदवारासमोर उभं केलं आहे. राज ठाकरेंच्या या चालीनं भाजपला धक्का बसला आहे. दुसरीकडे, महीममध्ये अमित ठाकरेंच्या उमेदवारीला भाजपाचं समर्थन आहे, आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांना माघार घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. भाजपकडूनही अमित ठाकरेंना पाठिंबा आहे, परंतु सरवणकर माघार घेण्यास तयार नाहीत. अशातच आता राज ठाकरेंनी यवतमाळमध्ये भाजपाचा टप्प्यात कार्यक्रम केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज ठाकरेंनी कोणाला उमेदवारी दिली?
भाजपच्या उमरखेड मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र नजरधने यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही राज ठाकरेंची चाल भाजपाला उमरखेडमध्ये झटका देणारी ठरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून, या यादीत 18 उमेदवारांची नावे आहेत. राज ठाकरेंनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही यादी शेअर केली आहे.