सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे सुपुत्र, प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ आणि वृक्ष अभ्यासक अरण्यऋषी मारूती भुजंगराव चित्तमपल्ली यांचे बुधवार, दि. १८ जून रोजी सायंकाळी ७.५० वाजता निधन झाले. सोलापुरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. १९ जून रोजी दुपारी रुपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोलापुरात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. १९ जून रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. भारत सरकारने नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. पुरस्कार स्वीकारण्यास ते दिल्लीला गेले होते. त्या प्रवासामुळे त्यांना कमालीचा थकवा जाणवत होता. गेल्या १० दिवसांपासून त्यांनी अन्न घेणे बंद केले होते. दिवसभरात ते तीन वेळा दूध घेत होते. बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने सोलापूर शहरासह राज्यभरातून वन्यजीवप्रेमी, महान संशोधक महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात भावजय, दोन पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
चित्तमपल्ली यांनी पक्षीकोश, पाणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन केले. वन्यजीव अभ्यासक म्हणूनही त्यांचे मोठे कार्य आहे. त्यांनी मराठी भाषेसाठीही मोठे योगदान दिले. या योगदानामुळेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र, पुरस्कार स्वीकारुन घरी आल्यापासून ते आजारी होते. दीर्घ आजारात आज सायंकाळी ७.५० च्या सुमारास राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
मारुती चितमपल्ली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापुरात झाला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यांनी टी. एम. पोरे विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतले. नॉर्थकोर्ट टेक्निकल स्कूलमध्ये माध्यमिक आणि सोलापूरच्या दयानंद कॉलेजमधून ते इंटरमिजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर कोईमतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेजमध्ये त्यांनी १९५८ ते १९६० या काळात वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर ते वनविभागात नोकरीला लागले. वन विभागात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. वन्यजीवनावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. अनेक पुस्तके लिहून त्यांनी निसर्गाची माहिती दिली. पक्षी जाय दिगंतरा आणि चकवा चांदणं यासारख्या त्यांच्या पुस्तकांनी वाचकांचा ठाव घेतला. मूळ तेलुगू भाषिक असलेल्या या दि ग्रेट माणसाने १ लाख मराठी शब्दांचा खजिना मराठी साहित्याला उपलब्ध करून दिला.
मारूती चितमपल्ली यांच्या नोकरीची सुरुवात सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वन विभागात झाली. त्यांनी महाबळेश्वर, वडगाव (मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर, बोटा, राजूर, गोंदिया, नवेगावबांध, पनवेल आणि पुणे येथे वन विभागात काम केले. १९९० मध्ये ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना सेवानिवृत्त झाले. चितमपल्ली यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात मोठे योगदान दिले.