बार्शी |
नुकतेच चित्रपट कलाकार सुनील शेट्टी यांनी टोमॅटोच्या भाव वाढीवर ट्विट करून टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे त्याच्या किचनचे बजेट कोलमडले असे म्हटले होते, त्यानंतर समाज माध्यमातून विविध कडवट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यातच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी देखील सुनील शेट्टी यांच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे.
गायकवाड हे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, शेतकरी आयुष्यभर टोमॅटो, कांद्यासह सर्वच शेतमाल पिकवून देखील सुनील शेट्टीच्या एक महिन्याच्या चहा पाण्यावरील किंवा मेकअप वरील खर्चा एवढेही पैसे शिल्लक ठेवू शकत नाही, शेती तोट्याची झाल्यामुळे देशातील दररोज सरासरी तीन हजार शेतकरी शेती सोडून देत असल्यामुळे शेतमालाचे भाव कमी जास्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी कर्जात जन्मतात, कर्जात जगतात आणि कर्जातच मरतात! मागील अनेक वर्षात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सर्व शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी असंख्य वेळा टोमॅटो, कांद्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून दिला, त्यामुळे “शेतकरी कर्जबाजारी होऊन आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या!” त्यावेळी शेतकऱ्यांची बाजू घेऊन या सुनील शेट्टीचे तोंड फाटले नाही! ज्या शेतकऱ्यांनी व त्यांच्या पोरांनी सुनील शेट्टीचे चित्रपट पाहून त्याच्या तिजोरीत अब्जावधी रुपये भरले.
एवढी मोठी रक्कम त्याच्या तिजोरीमध्ये कुजत पडलेली असतानादेखील इतक्या वर्षातून कधीतरी वाढलेले टोमॅटोचे भाव त्याला परवडत नसतील तर “शेतकऱ्यांनी देखील त्याचे चित्रपट पाहणे बंद करून त्याच्यावरती बहिष्कार टाकला पाहिजे” असेही यावेळी गायकवाड म्हणाले. तसेच टोमॅटो ही जीवनावश्यक वस्तू नसून, भाव वाढलेला शेतमाल महिनाभर खाल्ला नाही तर कोणीही हातपाय खोडून मरत नाही! असाही टोला त्यांनी यावेळी गायकवाड यांनी लगावला!