मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेवर कोरोनाच्या काळात कोट्यवधींचा घोटाळा केला असा आरोप आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, कोविड काळात टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाला होता. यात किशोरी पेडणेकर यांचा सहभाग आहे असंही ईडीने म्हटलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याने किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कलम ४२० आणि १२०बी अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा :५० कोटी रुपये मागणीच्या एकनाथ शिंदेंच्या आरोपाला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर
हे वृत्त आल्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनीही ट्वीट केलं आहे :
“कोविड घोटाळा” उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी “कोविड कफन मध्ये ही कमाई केली. १,५०० रुपयांची बॉडी बॅग (मृतदेह बॅग) ६,७०० मध्ये विकत घेतली. वेदांत इन्नोटेक प्रा.लि. कंपनी, महापालिकेचे अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा/FIR दाखल. असं ट्वीट किरीट सोमय्यांनी केलं आहे.