शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्यात गुरुवारी सभागृहात शाब्दिक चकमक उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याच्या विषयावर एकनाथ खडसे यांनी लक्षवेधीची सूचना सभापतींकडे दिली होती. परंतु हा विषय महत्त्वाचा असल्याने त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तर द्यावे, अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री सभागृहात येत नसल्याने काही दिवसांपासून ही लक्षवेधी पुढे ढकलली जात होती.
खडसे यांच्या लक्षवेधीवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सभागृहात हजर होते. अडीच तास ते थांबून होते, मात्र जेव्हा खडसेंची लक्षवेधी पुकारली गेली, तेव्हा पुन्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावे, अशी मागणी उचलून धरत गुबारावांची कोंडी केली. मात्र यावर मात्र गुलाबराव पाटील चांगलेच संतप्त झाले.
मुख्यमंत्र्यांकडूनच उत्तर पाहिजे होते, तर मग तसे पत्र सभापतींना द्यायचे असते. मी अडीच तासांपासून सभागृहात बसलो आहे. मुख्यमंत्र्यांनी मला उत्तर द्यायला सांगितले आहे, असे म्हणत तुम्ही महसुल, पुनर्वसन मंत्री होतात, तुमचा अभ्यास आहे, तर आम्ही उगाच चारवेळा निवडून आलेलो आहोत का? असे म्हणत गुलाबराव पाटील खडसेंवर संतप्त झाले.
यावेळी सभागृहात पाटील-खडसे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली तेव्हा सभापती निलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप केला. यावर सभागृहात उपस्थितीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लक्षवेधीवर उत्तर दिले तरी चालेल अशी भूमिका खडसे यांनी घेतली. मात्र यावर मी ब्रीफिंग घेतलेले नाही, तेव्हा उद्या माहिती घेवून उत्तर देतो असे सांगितले. दरम्यान, वरिष्ठ सभागृहात मुख्यमंत्र्यांकडून अन्याय होतोय. उपमुख्यमंत्री तरी सभागृहात हजर असतात, पण मुख्यमंत्री मात्र येत नाहीत. आवडता-नाआवडता असा काहीसा प्रकार सुरू आहे की काय? अशी शंका येते, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.