खेड येथील सभेनंतर काल मालेगावात पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली या सभेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचा सावरकर विषयी केलेल्या विधानावरून त्यांना खडेबोल सुनावले आहे. भारत जोडो यात्रेत आम्हीदेखील सहभागी झालो होतो. आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत; परंतु सावरकर हे आमचे दैवत असल्याने त्यांचा अपमान कदापिही पटणार नाही, असा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मालेगाव येथील जाहीर सभेत सुनावले.
तसेच यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह निवडणूक आयोग आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुद्धा समाचार घेतला होता, ठाकरे म्हणाले, सावरकरांनी देशासाठी कष्ट उपसले आहेत. आम्ही सावरकर भक्त आहोत. आपण लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. राहुल गांधी यांना डिवचले जात आहे. त्यामुळे त्यांनी फाटे फुटू न देता देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याच्या लढाईला बळ द्यावे, असा सल्लाही ठाकरे त्यांनी राहुल गांधी यांना दिला.
तसेच निवडणूक आयोगावर टीका करतानाच ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. आमच शिवसेना हे नाव चोरले, धनुष्यबान चोरला परंतु जिवाभावाची माणसं ते चोरू शकत नाहीत. मुख्यमंत्री असताना मी बळीराजाला कर्जमुक्त केले. परंतु आज ज्यांच्या गळ्यात घंटा बांधलेली आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री स्वत:च्या शेतावर रमतात परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जायला त्यांना वेळ नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
तसेच बावनकुळे यांचा समाचार घेताना म्हणाले की ठाकरेंपासून शिवसेनेला कुणीही तोडू शकत नाही. त्यांची ५२ कुळे खाली उतरली तरी ते शक्य नाही. येणारी निवडणूक भाजप मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली लढविणार काय, असा सवालही ठाकरे यांनी केला. आता या टीकेला शिंदे गटासह भाजपा काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.