कोल्हापूर | विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात वचन देऊनही आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याकडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पताका शहर आवारात बसवण्यात न आल्यामुळे संतप्त भीम सैनिकांनी सोमवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत चांगलाच धडा शिकवला यावेळी उपस्थित भीमसैनिकांनी जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता तसेच येणाऱ्या सहा महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नियोजित जागेवर बसवण्यात येईल, असे वचन आमदार यड्रावकर यांच्याकडून घेतल्यानंतरच मोर्चेकरी शांत झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती भागात उभा करण्यावरून गेल्या काही दिवसांपासून जयसिंगपुरात तिरडी मोर्चा, साखळी उपोषण अशी आंदोलने सुरू आहेत. आंदोलनाची दखल घेत नसल्याच्या रोषातून सोमवारी जयसिंगपूर नगर परिषद आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयाच्या येथे मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते.
शिरोळ-वाडी रस्त्यावरील बौद्ध विहारापासून मोर्चाला सुरुवात झाली. क्रांती चौक मार्गे हा मोर्चा चौथ्या गल्लीतील नगरपालिका इमारतीसमोर येऊन धडकला. येथेही मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुलाणी यांनी निवेदन स्वीकारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला असून त्याचा पाठपुरावा करत आहोत, असे सांगितले.
यानंतर आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या कार्यालयाकडे मोर्चेकरांनी धाव घेतली. मोर्चा त्यांच्या कार्यालयासमोर येताच पुन्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चातील सहभागी महिलांनी कार्यालयासमोरील पायऱ्यांवर ठिय्या मारला. पुतळ्याबाबत ठोस भूमिका जाहीर करत नाही, तोवर हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. २०१९ च्या जाहीरनाम्यात आश्वासन देऊनही ते अजून पूर्ण का झाले नाही असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला होता.