राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु झालेली पाह्यला मिळत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या दावोस दौऱ्यावरून उद्धव ठाकरे गटाने जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. अशातच आता पुन्हा एकदा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री दावोसला गेले, 40 कोटी खर्चून आले.. आणि रुपया पण नाही आणला. घोषणा खूप मोठ्या केल्या… पण रुपया कोणापर्यंत पोहचला नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.मी जेव्हा दावोसला गेलो, तेव्हा 4 दिवसात 80 हजार कोटी गुंतवणूक आणली होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे सोमवारी शिव संवाद यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर असून नाशिकरोड येथील आनंद ऋषी शाळेजवळील मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी ठाकरे म्हणाले की, सरकार बदलले, चेहरा बदलला, उद्योग कुठे गेले? 40 गद्दार गेले कुठे? 3 लाख नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग गुजरातला पळविले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मागच्या महिन्यात दावोसला गेले. मी जेव्हा दावोस ला गेलो तेव्हा 4 दिवसात 80 हजार कोटी गुंतवणूक आणली होती. हे गेले 40 कोटी खर्चून आले.. आणि रुपया पण नाही आणला. घोषणा खूप मोठ्या केल्या… पण रुपया कोणापर्यंत पोहचला नाही. घोटाळ्याचे घोटाळे महाराष्ट्रात होत आहे. महापालिकेत सगळीकडे प्रशासकच राज्य चाललं आहे. म्हणजे कंत्राटदार यांचं धोरण चालला आहे. जनतेचा पैसे वाचवायचे कसे हे लक्षात घेतले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.