विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष शिल्लक असताना इंदापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून आमदार दत्तात्रय भाराने आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच आपल्याला केवळ विकासकामे पूर्ण करायची आहेत. चौकाचौकात बोर्ड लावून विकास होत नसतो, लोकांचे प्रश्न सुटत नसतात, त्यासाठी काम करावे लागते. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार नसले, तरी इंदापूर तालुक्याचा आमदार मीच आहे आणि मी पण पवारांचा पठ्ठ्या असल्याने इंदापूरच्या विकासासाठी निधी कसा खेचून आणायचा, हे मला कुणी सांगायची गरज नाही, असा निशाणा दत्तात्रेय भरणे यांनी पाटील यांच्यावर साधला.
इंदापूर शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात आमदार भरणे हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, सुरेश गवळी, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे उपस्थित होते.
कोणतेही पद किंवा मिळालेली संधी, हे लोकांमध्ये मिरवण्यासाठी नसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे करण्यासाठी असते. त्यानुसार लोकांनी ज्या विश्वासाने मला आमदार म्हणून विजयी केले आहे, त्या विश्वासाला तडा जाणार नाही. येणाऱ्या दोन वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सन २०१४ पूर्वीचे इंदापूर आणि आताचे इंदापूर यात किती फरक झाला आहे, याचा विचार इंदापूरच्या जनतेने करावा. खरे कोण आणि खोटे कोण, हे ओळखावे, असे आवाहनही त्यांनी केले.