Latest Marathi News

BREAKING NEWS

‘कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत पोलिसांत तक्रार

0

 

शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे यांना अनेक आमदारांनी आणि मंत्र्यांनी पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते.

मात्र यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. तसंच त्यांनी काही जणांची भेटही घेतली होती. आपलं वर्षा हे निवासस्थान सोडण्यापूर्वीही त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, यावरून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हणत तेजिंदर पाल यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यांनी ऑनलाइन पद्धतीनं मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी खुद्द आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते आपल्या तक्रारीत म्हणतायत की, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाच्या रुग्णाला कोणालाही भेटण्याची परवानगी नाही, तसंच त्यानं आयसोलेशनमध्ये राहणं आवश्यक आहे. पण माध्यमांमध्ये दिसत असलेल्या दृष्यांमधून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केलं आणि त्यांनी समर्थकांची भेटही घेतली. मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती करत आहे, असं तेजिंदर सिंग यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.