Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगलीचा महापुराचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली पोलीस दलास सूचना

0

सांगली : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी. त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषसिद्धी वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

पोलीस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून त्यातील त्रृटी दूर कराव्यात. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाण्यांचा आढावा घ्यावा. यातील त्रृटी दूर कराव्यात. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे वेळ व पैसा वाचतो. जिल्ह्यामध्ये सर्व उपाय करून दोष सिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत केलेला माल परत करण्यात यावा, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना सूचित करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी 117 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूरमधील 2019 च्या महापुराचा धोका लक्षात ठेवून त्याप्रमाणे आवश्यक उपाययोजना कराव्यात. लोकांमध्ये जनजागृती करावी, असे त्यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पोलीस दल या चारही प्रमुख यंत्रणा सतर्क राहून परस्पर समन्वयाने संभाव्य महापूर परिस्थितीत कामगिरी पार पाडतील, अशी ग्वाही दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.