Latest Marathi News

BREAKING NEWS

छत्रपती शिवरायांप्रमाणे एकनाथ शिंदेंनाही डांबून ठेवले; भाजप नेत्याचे विधान

0

किल्ले प्रतापगडावर आज ३६५ वा शिवप्रतापदिन आहे. या शिवप्रतापदिन सोहळ्या निमित्त प्रतापगड सजला आहे. यानिमित्ताने ढोल-ताशाच्या गजरात शिवरायांचा जयघोष केला गेला. यावेळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. अशातच राज्याचे लक्ष वेधणाऱ्या शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमात आज आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले. यावेळी भाजप नेते व केंद्रीय पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे.

त्यांच्या या वक्तव्यावरून आणखी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्यक्रमात भाषणादरम्यान मंगलप्रभात लोढा म्हणाले, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवले होते; परंतु स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसेच एकनाथ शिंदेंनादेखील कोणी तरी डांबून ठेवले होते, आणि ते महाराष्ट्रासाठी बाहेर पडले, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाने महाराष्ट्रातील विरोधी पक्ष पेटून उठले आहेत. यामध्येच आता मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासमोरच असे वक्तव्य करण्यात आल्याने आता यावर शिंदे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.