माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला घेरल्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबई आणि मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांना या मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आव्हानच दिलं आहे. शेलार यांचं हे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वीकारलं आहे. चर्चा करायला उद्धव ठाकरे कशाला आम्ही काफी आहोत, असं प्रति आव्हान अंबादास दानवे यांनी दिले आहे.
माध्यमांशी अंबादास दानवे संवाद साधत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. मंत्रालयात आल्याने काम होते असे झाले असते तर फार परिवर्तन झालं असते. मोदींना विचारा कोव्हिड काळात कुठे कुठे गेले होते? अडीच वर्षात काय केलं हे शेतकऱ्यांना, धारावीमधील जनतेला जाऊन विचारा असा प्रतिसवाल दानवे यांनी आशिष शेलारांना केला
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, तुमचे एवढे खासदार, आमदार असून मतदारसंघात जात नाहीत. केंद्रातील एकाही मंत्र्याला कवडीचे काम नाही. 26 दिवसाचे दौरे त्यांच्या हातात दिले जातात. भाजपचे खासदार आणि मंत्री मतदारसंघात नसतात. केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्र्यांना दळण दळावे लागतेय, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. तुमचे किती आमदार शिल्लक राहिले ते आधी बघा. तुमचे 105 आमदार तोंड बघत बसतात. कधी मागच्या दरवाजाने जातील कळणार देखील नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.