चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे, उद्धव ठाकरे गटाचा टोला
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत युती करून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले तर दुसरीकडे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेत पडलेल्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात वाद होत असल्याचे चित्र दिसून आले होते त्यातच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर न पडू देण्याचा इशारा दिला होता. त्यावरुन, आता त्यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार पलटवार करत आहेत. उद्धव ठाकरेंवरील टीकेला प्रत्त्युत्तर देताना भास्कर जाधव यांनी थेट वेस्ट इंडिजच्या खेळाडूसोबतच त्यांची तुलना केलीय.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याव जोरदार टीका केली होती. फडतूस गृहमंत्री असल्याचं सांगत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाणे प्रकरणातील मारहाणीवरुन लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भाजप नेते ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरेंवर शाब्दीकरित्त्या तुटून पडले. त्यावेळी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट इशाराच दिला होता. उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही. आज तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात तर तुम्हाला घराबाहेरही पडू देणार नाही, असा थेट इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यावर, आता आमदार देशमुख यांच्यानंतर आता भास्कर जाधव यांनीही बोचरी टीका केलीय. ठाण्यातील सभेत बोलताना त्यांनी थेट वेस्ट इंडिजच्या खेळाडूसोबत त्यांची तुलना केलीय.
चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे, असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोचरी टीका केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जाधव यांनी बावनकुळे यांच्या दिसण्यावरुन टीकास्त्र सोडले.
यावेळी, पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, विवियन रिचर्ड मजबूत होता, चंद्रशेखर बावनकुळे पॅट्रिक पॅटरसनसारखा दिसतो का तर नाही, ब्रायन लारसारखो दिसतो का नाही मग तो कोणासारखो दिसतो तर वेस्ट इंडीजचा खेळाडू अॅम्ब्रोससारखा तो दिसतो, हे लक्षात आले. जुन्या लोकांना माहित आहे अॅम्ब्रोस कसे होते. नाहीतर बावनकुळे त्यांना रागवायचे, असे म्हणत जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोचरी टीका केली.