कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या खाजगी जागेवर काम करण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तीन लाख रुपयांची तरतूद केली आहे. हा शासकीय निधीचा गैरवापर असून महापौरांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी भाजप सदस्यांनी बुधवारी केली. सात दिवसात महापौरांनी राजीनामा न दिल्यास भाजपा उग्र आंदोलन करणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले.
महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते अजित ठाणेकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली ते म्हणाले, महापौरांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या खाजगी जागेतील कामाकरिता सार्वजनिक निधीची तरतूद करण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या सभेत मांडलेलेल्या अंदाजपत्रकात सभेमध्येच या कामाच्या मंजुरीची सही केली आहे. या कामाची तातडीने अंमलबजावणी करावी असे आदेशही महापौरांनी दिले आहेत.
महापौरांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून खाजगी जागेतील कामासाठी सार्वजनिक निधीचा वापर करणे हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या विरोधातील कृत्य आहे. महापौरांनी अशाप्रकारे बेकायदेशीर काम केल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद अपात्र ठरवण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही भाजपाने सुरू केली आहे.
महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपाने केली पण सत्ताधारी काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष करत आहेत. महापौरसारख्या पदाधिकाऱ्याने सार्वजनिक निधीचा वापर खाजगी कामासाठी करणे हे निषेधार्ह असून त्यांनी जनतेचा विश्वासघातच केल्याचा आरोप भाजपने केला आहे.