राज्यात सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर आता काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोडाफोडीच्या राजकारणात पंतप्रधान मोदी आणि मंत्री अमित शहा यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु केले आहे.
आज विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधकांना संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपच्या सत्तापिपासू राजकारणावर चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रवृत्तीचा सर्वजणांनी एकत्रिपणे लढा देण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रीपदे देतात. भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणता व त्यांनाच सत्तेत सोबत कसे घेता, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली.
पुढे बोलताना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी व भाजप भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा ही केवळ पोकळ गर्जना आहे. भ्रष्टाचार हा भाजपच्या रक्तात भिनलेला आहे. कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशनचे भाजपा सरकार होते व त्याच भ्रष्टाचारी लोकांचा पंतप्रधान प्रचार करत होते. भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन भाजप पक्षाची ताकद वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली.