गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशात आज सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवाय एकनाथ शिंदेंना बाबा ‘योगराज’ असं संबोधत त्यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे. गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे, अशी टीका लेखात करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा ‘योगराज’ हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत. एक मात्र नक्की, गुवाहाटीच्या योग शिबिरामुळे देशातला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे. एनकेनप्रकारे सत्ता स्थापन करायचीच, माणसे फोडायची, विकत घ्यायची, आमदारांचा बाजार भरवायचा या प्रवृत्तीविरोधात देश एकवटत आहे. त्यातूनच नव्या लढ्याची तेजस्वी किरणे बाहेर पडतील. जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते, पण गुवाहाटीच्या योग शिबिरात सर्वच बाबतीत अंधकार आहे, असंही लेखात म्हटलं आहे.
लेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल हिंदुस्थानचे डोळे ज्याकडे लागले होते ते कार्य पूर्ण होताना दिसत आहे. सुरतच्या ‘मेरिडिअन’ हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले ‘चिंतन’ कार्य अखेर ईशान्येकडील गुवाहाटी शहरात मार्गी लागले. गुवाहाटीस्थित ‘रॅडिसन ब्लू’ योग शिबिरात महाराष्ट्रातील चाळिसेक आमदारांचे सखोल चिंतन शिबीर सुरू आहे. त्या शिबिरात असा ठराव संमत झाला की, ”भारतीय जनता पक्ष एक महाशक्ती आहे. ही महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याने आपल्याला चिंता नाही.
” आसामच्या योग शिबिरात जे चाळिसेक योगार्थी आहेत ते कोण आणि कोठून आले, ते आता अखिल हिंदुस्थानास समजले. शिवसेनेचे पळवून नेलेले चाळिसेक आमदार गुवाहाटीमध्ये असून त्यांची चोख व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केल्याने या महाशक्तीचा काही जणांना नव्याने साक्षात्कार झालेला दिसतो. योग शिबिराच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका अधिक सुस्पष्ट करताना जाहीर केले की, ”भाजप या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्या महाशक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे.”
आसामातून अनेक दिव्य विचार सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. हिंदुत्वापासून स्वाभिमानापर्यंत नव्याने साक्षात्कार होत आहेत. बरं, या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकविला म्हणजे काय केले? योग शिबिरातील मंडळींना पाकिस्तानबाबत जे ज्ञान मिळत आहे, त्यावर काय बोलावे? पाकिस्तानची जिरवली किंवा पाकिस्तानला धडा शिकवल्याचे कोणते नवे पुरावे गुवाहाटीच्या योग शिबिरात समोर आणले? कश्मीरात पाकिस्तानची घुसखोरी कायम आहेच, पण मोठ्या प्रमाणात हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू आहे. हिंदूंनी पलायन केले आणि जाताना भारतीय जनता पक्षाला शाप दिले. स्वतःस हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सरकार दिल्लीत असताना कश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागते, हीच काय तुमची महाशक्ती? पाकिस्तानला खरेच धडा शिकविला असता तर काश्मीरच्या भूमीत हिंदू रक्ताचे पाट वाहताना दिसले नसते, असं लेखात म्हटलं आहे.