किराडपुरा दंगल प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला जबाबदार धरत त्यांनी कालिचरण महाराज यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. या दंगल प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणीही जलील यांनी केल्याने आता हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
तसेच खासदार इम्तियाज जलील यांनी किराडपुरा दंगलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. मात्र त्या पत्राची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ओळीत प्रतिक्रिया देऊन केल्यामुळे त्यावरूनही त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे.कालिचरणसारखे लोक येऊन भडकाऊ भाषण करत असतात त्यांना का अडवले जात नाही असा प्रतिसवालही जलील यांनी राज्य सरकारला केला आहे.
या दंगलीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. किराडपुरा दंगलीची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, त्यासाठी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवले होते मात्र यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठवले होते. मात्र त्यावर नरेंद्र मोदी यांनी मला फक्त एका ओळींचे पत्र पाठवले आहे.