शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर ‘ईडी’ अर्थात अंमलबजावणी संचालनालय विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर भाजपकडून ईडीचा वापर केला जात असून, विरोधकांना आपल्या पक्षात आणण्यासाठी ‘ईडी’चा वापर केला जात असल्याचा आरोप सतत होतोय. आजवर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडीची कारवाई झाली आहे.
दरम्यान औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने याविषयी शहरात भन्नाट होर्डिंग लावले आहे. भाजपमध्ये गेल्यावर ‘ईडी’ची कारवाई झाल्याचं दाखवा आणि दहा लाख मिळावा असा उल्लेख या होर्डिंगवर करण्यात आला आहे. सोशल मीडियामध्ये या फोटोची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई झाल्यावर ते भाजपमध्ये जात आहे. तर भाजपमध्ये जाताच कारवाईची फाईल बंद होते असा आरोप विरोधकांडून केला जात आहे.
आता या सर्व चर्चेत सोशल मीडियावर एक फोटो कालपासून प्रचंड व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद शहरात ईडीच्या कारवाईबाबत ठीक-ठिकाणी हे बॅनर लावले असून, ज्यात दहा लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली आहे. सध्या या बॅनर ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.