Latest Marathi News

BREAKING NEWS

‘भाजपच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते’; सामनातून घणाघाती टीका

0

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशातच शिवसेनचे मुखपत्र असलेल्या आजच्या सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवाय एकनाथ शिंदेंसह गेलेल्या आमदारा वेळीच सावध होण्याचा सल्ला दिला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार? यावर पैजा लागल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार? यावर चर्चा झडत आहेत. राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते.

शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला आणि नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये, असं लेखात म्हटलं आहे.

लेखात म्हटलं आहे की, सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे ‘महामंडळ’ होते, तेथे महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. पुन्हा सुरतवरून हे लोक आसामला जाताच गुवाहाटी विमानतळावर आसामचे मंत्री स्वागतास हजर होते. यामागचे पेच-डावपेच न समजण्याइतकी राज्याची जनता खुळी नाही. हॉटेल्स, विमान, गाड्या, घोडे, विशेष सुरक्षा व्यवस्था ही भाजप सरकारचीच कृपा नाही काय? आम्हाला तर भारतीय जनता पक्षाच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते.

कालपर्यंत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या शिवसेना आमदारांवर हल्ले करणारे, त्यांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा धाक दाखवून, ”आता तुमची जागा तुरुंगात” असे बोलणाऱ्या किरीट सोमय्यांचे यापुढे कसे होणार? हे सर्व आमदार कालपासून भाजपच्या गोटात शिरले आहेत आणि दिल्लीतील राजकीय गागाभट्टांनी त्यांना पवित्र, शुद्ध करून घेतले आहे. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते, असा टोला यात लगावला आहे.

अग्रलेखात पुढं म्हटलं आहे की, नितीन देशमुख हे अकोल्याचे आमदार सुरतवरून मुंबईस परतले आणि त्यांनी जे घडले, त्याबाबत धक्कादायक असे सत्यकथन केले. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर उत्साहाच्या लाटा उसळल्या असून लाटेचा फेस अनेकांच्या नाकातोंडात गेला आहे, पण भाजप कोणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छिते? नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल.

तसेच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले आणि आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे. लोकमानसात उद्धव ठाकरे प्रिय आहेत, असं लेखात म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.