Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजप कार्यकर्त्यांची शिंदे गट शहराध्यक्षाच्या हॉटेलवर दगडफेक, हॉटेल मालकासह कामगार जखमी

0

राज्यात शिंदे फडणवीस सरकार गुण्यागोविंदाने राज्य चालवत असताना मात्र स्थानिक पातळीवर शिंदे गट आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुफान धिंगाणा घालत शिंदे गटाचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत नागरिकांच्या चारचाकींचे प्रचंड नुकसान झाले. याप्रकरणी भाजपाचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मुलासह 50 ते 60 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-पुणे महामार्गावर केडगाव येथे शिंदे गटाचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांचे ‘रंगोली’ नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या समर्थकांनी हॉटेलवर तुफान दगडफेक केली. 50 ते 60 जणांनी अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने हॉटेल परिसरात प्रचंड पळापळ सुरू झाली. दगडफेकीत ग्राहक म्हणून आलेल्या नागरिकांच्या गाडय़ांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच याच परिसरात राहणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक अमोल येवले आणि संग्राम कोतकर यांचे समर्थक घटनास्थळी दाखल झाले.

तसेच नागरिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी घटनेचा निषेध नोंदवत नगर-पुणे महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला.दगडफेकीची माहिती मिळताच, कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दाखल होताच दगडफेक करणारे पसार झाले. त्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. दरम्यान, ‘रंगोली’चे मालक विठ्ठल सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांच्यासह 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.